जिल्ह्यात पाऊस; बारामती, इंदापूर, दौंड कोरडाच

पुणे – शहरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. मागील 2 दिवसांत मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाल्यामुळे मुळशी, पवना, खडकवासला आणि भाटघर धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. मावळ परिसरात सर्वाधिक 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुळशी आणि मावळ तालुक्‍यांत जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी पुन्हा वाढली आहे. गेल्या 24 तासांत मुळशीमध्ये 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वेल्ह्यामध्ये 30 तर भोर तालुक्‍यात 18 मिमी पाऊस झाला आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि हवेली तालुक्‍यांत प्रत्येकी 2 ते 6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, यावेळी जिल्ह्यातील पूर्व भागात पाऊस रूसलेलाच आहे. शिरूर, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्‍यांत पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी चिंचेत आहे. पुरंदर तालुक्‍यात पावसाचा शिडकाव झाला. त्यामुळे हे तालुके कोरडेच असून, पाण्याचे संकट कधी संपणार, वरुणराजा आता तरी ये अशी हाक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.

दौंड तालुक्‍यात सरासरी 319 मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, आतापर्यंत केवळ 181 मिमी पाऊस झाला आहे. बारामतीमध्ये सरासरी 352 आणि इंदापूरमध्ये 353 मिमी पावसाची अपेक्षा आहे. परंतु, गेल्या सव्वातीन महिन्यांत बारामतीमध्ये केवळ 253 तर इंदापूरमध्ये 179 मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही काही गावांमध्ये पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मावळमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
मावळ तालुक्‍यात सरासरी 1 हजार 143 मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, यावर्षी सर्वाधिक 3 हजार 323 मिमी म्हणजेच तब्बल 2 हजार 180 मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर मुळशी तालुक्‍यातही सरासरीपेक्षा 1 हजार 300 मिमी पाऊस अधिक झाला आहे. भोर तालुक्‍यात सरासरी 887 मिमी पाऊस अपेक्षित आहे. यावर्षी 1 हजार 949 म्हणजेच 1 हजार मिमी पाऊस अधिक झाला आहे. जुन्नर तालुक्‍यातही सरासरीपेक्षा 400 तर खेडमध्ये 600 मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×