जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

जनजीवन विस्कळीत : महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला

सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारी सकाळपासून वाढल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. दिवसभर पावसाची संततधार असल्याने सातारा, कराड, पाटण या शहरांसह अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरही पाण्याचे लोंढे वाहत असल्याने वाहतुकीचा वेगही पावसामुळे मंदावला होता. सातारा-पुणे प्रवासासाठी सहा ते आठ तासांचा वेळ लागत होता.

साताऱ्यात ठिकठिकाणी इमारतींच्या बेसमेंटमध्ये, घरे आणि दुकानांमध्ये पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाने शुक्रवारपासून थैमान घातले आहे. शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने सातारा शहरात पोवई नाक्‍यासह अनेक ठिकाणी आणि उपनगरांमध्ये पाणीच पाणी झाले होते. कर्मवीर पथ व राधिका रोडला तळ्याचे स्वरूप आल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. दिवाळी तोंडावर असूनही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत नसल्याने व्यापारी, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. नेहमीच्या कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती.

बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते विसावा नाका या दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाने रविवारी पहाटे तीन वाजल्यापासून तुफान बॅटिंग करत संपूर्ण सातारा शहर धुवून काढले. एसटी स्टॅंड, राजवाडा, सदाशिव पेठ, राजलक्ष्मी थिएटर परिसरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. सातारा-लोणंद रस्त्यावरील वाहतूक जोरदार पावसामुळे बंद करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक आरळे पुलावरून रोखण्यात आली होती. सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली येथील कृष्णा पुलाच्या परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. बॅरिकेडस्‌ लावून दोन्ही बाजूची वाहतूक आळीपाळीने मार्गस्थ करण्यात येत होती. यवतेश्‍वर घाटातून पाण्याचे प्रचंड लोट सातारा शहरातील बोगदा परिसरातील रस्त्यांवर वाहत होते. त्यामुळे बोगदा ते समर्थ मंदिर रस्ता जलयम झाला होता.

मात्र, साताऱ्यात कुठेही घरांची अथवा भिंतींची पडझड झाल्याची नोंद झाली नव्हती. पुणे-बंगलोर महामार्गावर वाहतूक पावसामुळे मंदावली होती. प्रचंड खड्डे, मुसळधार पाऊस, टोल नाक्‍यांवरील गैरव्यवस्थापन यामुळे दोन तासांचा सातारा-पुणे प्रवास पाच ते आठ तासांचा झाला होता. मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी व मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्याचा फटका प्रवाशांना बसला. लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेसही वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सोसावा लागला. दरम्यान, या पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. या अस्मानी संकटामुळे नागरिक धास्तावले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहरे व गावांमधील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. माण, खटाव, कोरेगाव या तालुक्‍यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली.
मतदान पेट्या अडकल्या
पाटण तालुक्‍यात काही ठिकाणी पावसाने मतदानाच्या पेट्या मतदान केंद्रापर्यत नेण्यात अडचणी निर्माण झाल्या. मुसळधार पावसामुळे कसणी येथील ओढ्यावर आलेल्या महापुराने कसणी, वरचे घोटील आणि निगडे याठिकाणी मतदान यंत्रणा रात्री उशिरापर्यंत पोहचलेली नव्हती. त्यामुळे पाऊस असाच राहिल्यास याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
नाणेगावात महिला वाहून गेली
चाफळ विभागातील नाणेगाव खुर्द येथे ओढ्याला आलेल्या पावसाचे पुरात महिला वाहून ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शांताबाई सर्जेराव थोरात (वय 65) रा. नाणेगाव खुर्द असे सदर महिलेचे नाव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.