पुढील 24 तासांत राज्यात काही भागांत मुसळधार

पुणे – राज्यात पुढील 24 तासांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तर कोकण-गोव्यातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील अतितीव्र चक्रीवादळाचे रुपांतर आता तीव्र चक्रीवादळात झाले असून, ते पश्‍चिम-मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर आहे. गुरुवारी (दि. 7 नोव्हेंबर) या चक्रीवादळाची तीव्रता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस पडेल. दरम्यान, नोव्हेंबर महिना सुरू होवूनही पाऊस सुरू असल्यामुळे कमाल व किमान तापमानात सतत बदल होत आहे.

बुधवारी (दि. 6) दिवसभरात महाबळेश्‍वर येथे सर्वात कमी 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर, सांताक्रुझ येथे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.पुणे शहर आणि जिल्ह्यात दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी संध्याकाळी हजेरी लावली. डेक्‍कन, कोथरूड, कात्रज, औंध, येरवडा आणि कॅम्प परिसरात हलक्‍या सरी झाल्या. शहरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.