आंबेगाव तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी

पावसाअभावी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

– विशाल करंडे

लाखणगाव – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने ओढ्या-नाल्यांना अद्याप पाणी वाहत नाही. तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचे प्रमाण मंदावल्याने घोडनदीत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. तसेच विद्युत मोटारी सुरू झाल्याने नदीपात्रातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आंबेगाव तालुक्‍यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेती पिके सुकू लागली असून शेतकऱ्यांनी विहिरी आणि नदीतील पाणी उपसा सुरू केला आहे. पश्‍चिम आदिवासी भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने घोडनदीतील पाण्याची आवक थांबली आहे. तसेच घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे अद्याप मोकळे असल्याने पाणी वाहून जात आहे. उर्वरित राहिलेल्या पाण्याचा उपसा शेतकऱ्यांनी शेतीपंपाद्वारे सुरू केल्याने घोडनदीपात्रातील पाणी कमी होऊ लागले आहे.

पावसामुळे डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेणू सागर) येथील पाणी पातळी 35 टक्‍के पर्यंत गेली आहे, परंतु मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. तसेच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदीत येणाऱ्या पाण्याचीही आवकही मंदावली आहे. मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर ऊन जाणवत आहे. या उन्हामुळे शेती पिके सुकू लागली असून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. पाऊस पडल्यास पेरणी केलेली पिके तरी हाताशी येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

जमिनीतील पाण्याची पातळी घटली
पावसाअभावी जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. विहिरींच्या पाणीपातळीतही म्हणावी तशी वाढ झाली नाही. पिके सुकू लागली आहेत. डिंभे धरणातील पाणीसाठा कमी असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांना तसेच कालव्यालगत असणाऱ्या गावांनाही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. पाऊस केव्हा होईल, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)