अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना 50 कोटींचा फटका

जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी आयुक्तांना अहवाल सादर : 3 हजार 176 हेक्‍टर जमिनीचे नुकसान

पुणे – पुणे जिल्ह्यात 25 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामुळे 9 हजार 134 शेतकऱ्यांचे 3 हजार 176 हेक्‍टरवरील फळबागा, पिके व शेतजमिनींचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 50 कोटींचे नुकसान झाल्याचा महसूल विभागाकडून सादर केलेल्या प्राथमिक अहवालात अंदाज व्यक्‍त केला जात आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा प्राथमिक अहवाल कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांना सादर केला आहे.

जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख 93 हजार 291 हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी बारामती, हवेली, पुरंदर, आणि भोर तालुक्‍यातील 154 गावांमधील पिकांचे नुकसान झाले आहे. पुरंदर तालुक्‍यातील वज्रगड व किल्ले पुरंदर आणि परिसरात 25 सप्टेंबरला ढगफुटी झाली. त्यामुळे या परिसरातील सासवड, नारायणपूर, भिवडी, चिव्हेवाडी, सुपे खुर्द अशा एकूण 20 पेक्षा अधिक गावांमधील शेतजमीन, उभी पिके, घरे, जनावर, गोठे, वाहने यांना मोठा फटका बसला. या परिसरातील अनेक विहिरी गाळाने भरल्या तर काही विहिरी खचल्या. बारामतीमध्ये पुराच्या पाण्यामुळे मोरगाव, तरडोली, जळगाव सुपे, जळगाव कप, बाभुर्डी, मेडद, बऱ्हाणपूर, नेपतवळण, कऱ्हा वागज, डोर्लेवाडी, लोणी भापकर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

या प्राथमिक अहवालानुसार हवेली तालुक्‍यातील एक हजार 308 शेतकऱ्यांचे हेक्‍टर 329 हेक्‍टरचे, भोर तालुक्‍यातील 602 शेतकऱ्यांचे 157 हेक्‍टर, वेल्हा तालुक्‍यातील 221 शेतकऱ्यांचे 15 हेक्‍टर, पुरंदर तालुक्‍यातील पाच हजार 662 शेतकऱ्यांचे दोन हजार 301 हेक्‍टर तर बारामतीमधील एक हजार 341 शेतकऱ्यांचे 374 हेक्‍टर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू
स्थानिक कृषी विभाग, महसूल कर्मचाऱ्यांनी गावातील नागरिकांशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. त्यामध्ये पिकांचे नुकसान, राहती घरे, जनावरे व वाहून गेलेल्या वाहनांचा समावेश आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आली आहे. नुकसान झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची निश्‍चित आकडेवारी समजू शकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.