पिंपरी – यंदा 104 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारली. तर 3, 4 आणि 5 ऑगस्टला पुणे जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता. मात्र सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात पावसाचा केवळ शिडकाव झाल्याने पहिल्या दिवशी भाकित फेल ठरले.
जून-जुलैचा पहिला टप्पा संपल्यानंतर आता ऑगस्ट -सप्टेंबरच्या दुसऱ्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडणार असल्याच्या हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. तर 3, 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, पहिल्याच दिवशी (दि.3) शहरात केवळ हजेरी लावण्याइतपत पाऊस झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला.
जून-जुलै महिन्यात पावसाने सर्वांचीच निराशा केली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा तुलनेत कमी झाल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरीही चिंतेत आहे.