ढेबेवाडी विभागात पावसाने जनजीवन विस्कळीत

उमरकांचन येथे घरांना पाण्याचा वेढा, आठ गावांचा संपर्क तुटला
वाहतूक ठप्प झाल्यामुळे आठवडा बाजारावर परिणाम
पुनर्वसित डिचोली-धोंडेवाडी येथील बंधारा फुटला

सणबूर – गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ढेबेवाडी परिसरातील अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. रविवारी रात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारच्या बाजारावर त्याचा चांगलाच परिणाम झाला. मराठवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून उमरकांचन मधील खालची अळी येथील अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. या पावसाने या विभागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून याचा फटका ढेबेवाडी बाजारपेठेतील अनेक लहानमोठ्या व्यापाऱ्यांना बसला आहे.

या विभागातील पवारवाडी-जाधववाडी पूल पाण्याखाली गेल्याने मेंढ, जाधववाडी, मत्रेवाडी, निवी, कसणी, घोटील, निगडे, माईगडेवाडी या परिसरातून मंगळवारी आठवडा बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांना डाकेवाडी, काळगाव, येळेवाडी या मार्गे ढेबेवाडी येथे यावे लागल्याने वेळ आणि आर्थिक फटका सहन करावा लागला. पवारवाडी जाधववाडी पूल पाण्याखाली गेल्याने सोमवारी सकाळ पासून या मार्गावरील वाहतूक बंद होती. याचा आठवडा बाजारावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेक खाजगी वाहने त्याच बरोबर निगडे येथून सुटणारी एस. टी. बस सकाळपासून जाधववाडी पुलाजवळ पुराचे पाण्यामुळे थांबून होती.

ढेबेवाडी-पाटणला जोडणारा मंद्रुळकोळे येथील वांग नदीवरील पूल सुध्दा मंगळवारी सकाळपासून पाण्याखाली गेल्याने पाटणसाठी जाणारी वाहतूक मालदनमार्गे सुरु होती. याशिवाय मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेलेली आहेत. सततच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उमरकांचन-जिंती हा जुना रस्ता अतिवृष्टीने उमरकांचन जवळ खचल्याने जिंतीला जाणारी वाहतूक नवीन रस्त्याने वळवण्यात आलेली आहे.

मराठवाडी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाने वांगनदी काठच्या अनेक गावांना पुराचे पाण्याचा धोका निर्माण झालेला असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
कराड, दि. 31 (प्रतिनिधी) -पुनर्वसित डिचोली-धोंडेवाडी, ता. कराड येथील गावठाणच्या बाजूचा मातीचा बंधारा गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसाने वाहून गेला. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

सदर बंधाऱ्याची संबंधित विभागाने तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्व ठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. कोयना अभयारण्यातील डिचोली गावाचे शासनाने सहा वर्षांपूर्वी धोंडेवाडी येथील आगाशिव डोंगराशेजारी वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे.

गेली सहा वर्षांपासून येथे 50 कुटुंबे राहत आहेत. पुर्वसितांना पिण्यासाठी सार्वजनिक विहिर, बोअरचे पाणी उपलब्ध करुन शेतीला पाणी मिळण्यासाठी शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून तीन बंधारे बांधले आहेत. यामध्ये एक आर. सी. सी. तर दोन मातीच्या बंधाऱ्यांचा समावेश आहे. यामधील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणारा हा बंधारा गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. बंधारा फुटल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. बंधारा वाहून गेल्यामुळे पावसाळ्यानंतर शेतीला पाणी मिळू शकणार नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने बंधाऱ्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी पुनर्वसित ग्रामस्थांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.