जुन्नरमध्ये पावसाने पिके धोक्‍यात

* कुकडी प्रकल्पात 94.37 टक्‍के पाणीसाठा
* अतिपावसामुळे शेतकरी चिंतातूर
नारायणगाव,(अतुल कांकरिया )- सध्या सुरू असलेल्या परतीच्या धुवाधार पावसामळे आता “जा रे, जा रे पावसा, तुला देतो पैसा…’ अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या संततधार सुरू असलेल्या पावसाने अनेक पिके धोक्‍यात आली आहेत. मात्र, असे असले तरी परतीच्या पावसामुळे जुन्नर तालुक्‍यातील कुकडी प्रकल्प धरण साठ्यात सध्या 94.37 टक्के पाणीसाठा असल्याने तालुक्‍यात या वर्षी पाण्याची समस्या निर्माण होणार नसल्याने नागरिक समाधानीही आहेत.
बाजारपेठेत ऐन दिवाळीत उलाढाल कमी
जुन्नर तालुका हा शेतीवर अवलंबून आह. शेती हेच येथील प्रमुख आर्थिक साधन आहे. येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन असल्याने बाजारपेठेत आर्थिक उलाढालही चांगली होत असते. यंदाच्या दिवाळीसारखा महत्त्वाचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे, मात्र, पावसामुळे बाजारपेठेत ग्राहक नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
कुकडीत गतवर्षीपेक्षा अधिक साठा
कुकडी धरणसाठ्यात मागील वर्ष 2018 ला 23 ऑक्‍टोबर 2018 अखेर 23 हजार 910 दशलक्ष घनफूट म्हणजे 80.56 टक्के पाणीसाठा होता. यंदा आजअखेर 28 हजार 8 दशलक्ष घनफूट म्हणजे 94.37 टक्के पाणीसाठा आहे. एकूणच 13.81 टक्के पाणीसाठा जास्त आहे.
पाच धरणात उपलब्ध पाणीसाठा
जुन्नर तालुक्‍यातील येडगाव, वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगा आणि आंबेगाव तालुक्‍यातील डिंभा या सर्व धरणांमध्ये एकूण 94.37 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. येडगाव धरणात पाणीसाठा 1750 दशलक्ष घनफूट – 90.03 टक्के, माणिकडोह धरणात 8985.12 दशलक्ष घनफूट – 88.26 टक्के, वडज धरणात 1173.38 दशलक्ष घनफूट – 100 टक्के, पिंपळगाव जोगा धरणात 3604.18 दशलक्ष घनफूट – 92.65 टक्के आणि आंबेगाव तालुक्‍यातील डिंभा धरणात 12494. 92 दशलक्ष घनफूट – 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.