कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

पाणीसाठा 76.07 टीएमसी
पायथा वीजगृहातून आज पाणी सोडणार
नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा 

पाटण – गत चार-पाच दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असून बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम होता. पावसाच्या संततधारेमुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे. धरणात प्रतिसेकंद 54021 क्‍युसेक पाण्याची आवक होत असून पाणीसाठा 76.07 टीएमसी झाला आहे.

पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास धरणात निर्धारित पाणीसाठा राखण्यासाठी पायथा वीजगृहातून गुरूवारी सकाळी 8 वाजता 2 हजार 100 क्‍युसेक पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली. 26 जुलै पासून कोयना पाणलोट क्षेत्रासह तालुक्‍यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कोयना, केरा, उत्तरमांड, तारळी, वांग या नद्यांना पूर आला आहेत. ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्वपूर्ण असणारे पूल पाण्याखाली गेल्याच्या घटना घडत आहेत.

मराठवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे खळे येथील फरशी पुल पाण्याखाली गेला आहे. तर गुरूवारी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सोडण्यात येणाऱ्या 2100 क्‍युसेक पाण्यामुळे मुळगाव पुल ही पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना कोयना धरण व्यवस्थापनाने दिल्या आहेत.सलग चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. पाणीपातळी 2136.09 फूट झाली असून उंची 651.281 मिलीमीटर झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात कोयना 341 (3269) मिलीमिटर, नवजा 262 (3807) मिलीमिटर, महाबळेश्‍वर 253 (3200) मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.