नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. मात्र, हे खेळाडू मैदानावर एकमेकांची थट्टा देखील करत नाहीत इतके गंभीरपणे वावरत असतात. करोनामुळे सर्व खेळाडू घरातच असून सोशल मीडियावर सक्रिय आहेत. यावेळी धोनीने आपला दाढी वाढलेला एक फोटो पोस्ट केल्यावर, माही, तू तो बुढा हो गया यार, अशी प्रतिक्रिया देत रैनाने धोनीची थट्टा केली.
या दोघांच्या संवादाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड पाहिला जात आहे. आयपीएल स्पर्धेत चेन्नई संघाचा कर्णधार धोनी असून त्याच्याच नेतृत्वाखाली याच संघात रैना देखील खेळतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आसताना या दोघांची मैत्री झाली ती आजही तितकीच घट्ट आहे. चेन्नई संघाने आपल्या ट्विटरवर या दोघांचा एक जुना फोटो देखील पोस्ट केला आहे. त्यात हे दोघे बराच वेळ गप्पा मारताना दिसत आहेत.
रैनाला सुमार कामगिरीमुळे भारतीय संघातील स्थान गमवावे लागले तर, धोनीने इंग्लंडमधील विश्वकरंडक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यामुळे हे दोघेही मित्र खूप काळानंतर एकमेकांशी संवाद साधत होते, त्यावेळी धोनीला त्याच्या पांढऱ्या दाढीवरून रैनाने चांगलेच सतावले.
हे दोघेही खेळाडू यंदाच्या आयपीएल स्पर्धेची सुरुवात कधी होईल या प्रतीक्षेत आहेत. दोघांनाही भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे. रैनाला कामगिरी सिद्ध करावीच लागणार आहे, तर धोनीला कामगिरीबरोबरच तंदुरुस्ती देखील सिद्ध करावी लागणार आहे.