बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गुंजाळवाडी,राजुरी, आळे, साकोरी,बेल्हे व परिसरातील गावांमध्ये दुपारी व सायंकाळी वादळ- वारा विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.साकोरी (ता.जुन्नर) येथील मारुती गाडगे या शेतकऱ्यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडली.
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. शनिवार (दि.१०) दुपारी ३ वाजल्या पासून वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट सुरू झाला होता.६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा विजांचा कडकडाटा झाला. पावसाला सुरुवात झाली.
शेतकऱ्यांनी शेतामध्ये काढून ठेवलेला कांदे झाकून ठेवण्यासाठी धांदल उडाली.गाडगे यांच्या राहत्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडली.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला व झाड बहुतांशी जळून गेले. काही शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले आहे तर आंब्याच्या बागांचे नुकसान झाले आहे.