मुंबई : राज्यात पावसाचे कोणतेही विघ्न न येता लाडक्या बाप्पाला मोठया उत्साहात, वाजतगाजत निरोप दिला. यानंतर पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिला आहे. राज्यात विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिशाला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात संपूर्ण गणेशोत्सवात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या, पण कुठेही मुसळधार पाऊस झाला नाही. दरम्यान, आता झारखंड आणि छत्तीसगड परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार आहे.
परभणी, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २१ सप्टेंबरला संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. २३ सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.
विदर्भासह बाकीच्या भागातही पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. याशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. गंगा डेल्टा आणि बांगलादेशाजवळील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पर्जन्यवृष्टीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे या प्रदेशांमध्ये अतिवृष्टी होत आहे.