पावसाच्या पाण्याच्या पुनर्वापर

पुणे – शहरातील विकासकामांमुळे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात भूर्गभातील पाण्याची पातळी खालवली आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगला शहरात प्रोत्साहन देतानाच महापालिकेकडून पावसाळ्यात पालिकेच्या इमारतींवर साठणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी या पाण्याचा वापर करणे शक्‍य नाही अशा ठिकाणी बोअरवेल खोदून हे पाणी पुन्हा भूगर्भात सोडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प महापालिकेची मुख्य इमारत, घोले रस्ता येथील नेहरू सांस्कृतिक भवनाची इमारत तसेच कमला नेहरू रूग्णालयात राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी “दै. प्रभात’शी बोलताना दिली.

महापौरांनी महापालिकेच्या माध्यमातून शहरासाठी जलयुक्त शहर अभियान सुरू केले आहे. त्याचा प्रमुख उद्देश शहराची पाणीपातळी वाढविण्यासह पाण्याची बचत आणि पाण्याचे संवर्धन आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचाही सहभाग घेण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आता महापालिकेच्या शाळा, इमारती, प्रमुख रुग्णालये, सांस्कृतिक केंद्रांच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे संकलन केले जाणार आहे. त्यासाठीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे संकलन करणार
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, शाळा, इमारती, प्रमुख रूग्णालये, सांस्कृतिक केंद्रांच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे संकलन केले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी महापालिकेकडून भविष्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबविण्यासाठी हे पाणी जमिनीपर्यंत पाईपद्वारे आणण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर हे पाणी थेट ड्रेनेज लाईनमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे या पाण्याचा कोणताही वापर होत नाही. ही बाब लक्षात घेऊन अशा ठिकाणचे पाणी एका स्वतंत्र पाईपद्वारे संकलित करून ते जवळील उद्यान अथवा वापरायच्या पाण्याच्या टाकीत सोडले जाणार आहे. त्यामुळे या पाण्याचा पुनर्वापर शक्‍य होणार आहे. तसेच ज्या ठिकाणी संकलनाची सुविधा नाही अशा ठिकाणी महापालिकेने या पूर्वी बोअरवेल घेतलेले असल्यास हे पाणी शास्त्रीय पद्धतीने भूर्भागत सोडले जाणार आहे. तर ज्या ठिकाणी बोअरवेल नाहीत, अशा ठिकाणी नव्याने बोअरवेल घेऊन ही यंत्रणा उभारली जाणार आहे.

97 शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग
दरम्यान, महापालिकेच्या शाळांच्या सुमारे 147 इमारती असून त्यातील 97 ठिकाणी पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. मात्र, त्यातील काही प्रकल्प बंद असून काही सुरू आहेत. तर महापालिकेच्या मुख्य इमारतीतही हा प्रकल्प असला तरी तो बंद अवस्थेत आहे. त्यामुळे तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा आराखडा तयार करण्यात येत आहे. एकाच वेळी सर्व ठिकाणी ही यंत्रणा उभी करणे शक्‍य नसल्याने टप्प्या टप्प्याने हे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील पाणी बचतीसह भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ करणे शक्‍य होणार आहे.
– मुक्ता टिळक, महापौर

Leave A Reply

Your email address will not be published.