बहुतांश स्थानिक क्रीडा स्पर्धांवर पावसाचे पाणी

मैदानांची अवस्था दयनीय…
पुण्यात अनेक मैदानांवरील सुविधांची निर्मिती आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी वा बाबुराव सणस मैदान पाहिले इथे पुढील तीन-चार महिने तरी स्पर्धा होतील का, अशी शंका येते. येथील व्यवस्था पाहणारा कर्मचारी वर्ग अफाट मेहनत घेत स्पर्धांसाठी तयारी करतो. मात्र वरुणराजाच्या अवकृपेने यंदा सगळ्यांच्याच तयारीवर पाणी फेरले आहे. येत्या काही दिवसांत परतीचा मोसमी पाऊस राज्याबाहेर गेला, तरच या स्पर्धा काहीशा उशिरा का होईना पण पूर्ण होतील, अशी आशा आहे. 

पुणे: स्थानिक क्रीडा स्पर्धा साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात सुरु होतात, मात्र यंदा पावसाळाच इतका लांबला की, कोणत्याही खेळाच्या संघटनेला स्पर्धांचे वेळापत्रक देखील करता आले नाही. त्यामुळे यंदा पुण्यातील बहुतांश स्पर्धा पाण्यात वाहून गेल्या आहेत, असेच म्हणावे लागेल.

हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि काही प्रमाणात टेनिसच्या स्पर्धा पावसाच्या व्यत्ययानंतर देखील झाल्या. अर्थात क्रिकेट, मैदानी स्पर्धा, जलतरण, मुष्टियुद्ध, सायकलींग, बास्केटबॉल, हॅंडबॉल, खो-खो, कबड्डी आणि कुस्ती या स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडले.

खरेतर सप्टेंबरमध्ये शालेय, महाविद्यालयीन, क्‍लब, जिल्हा परिषद, महापालिका, विद्यापीठ, राज्य अशा विविध स्तरांवरच्या स्पर्धांचा बोजवारा वाजला. काही प्रमाणात स्पर्धा घेण्यात यश आले मात्र तरी देखील पावसाच्या खेळामुळे आता मूळ वेळापत्रक पुढे जाणार आहे. त्यातही विद्यार्थांच्या परीक्षा पण सुरू झाल्या, काही परीक्षा तर संपल्या असून दिवाळीच्या सुट्टीतील क्रीडा स्पर्धांचाच खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे.

राज्य, राष्ट्रीय, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना देखील नियमित तसेच परतीच्या मोसमी पावसाचा फटका बसला.
आता दिवाळीनंतरचे वेळापत्रक जरी पूर्ण झाले, तरी शहरातील दरवर्षी होणारे सामने तरी सुरळीत पार पडतील, अशी संयोजक आणि खेळाडूंची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.