करोनामुळे कमालीचा परिणाम : हजारो व्यावसायिकांना आर्थिक फटका
पुणे – लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायावर कमालीचा परिणाम झाला आहे. उन्हाळी पर्यटन रोजगार बुडाल्यानंतर आता पावसाळी पर्यटनावरही करोनाचे सावट आहे. पुणे शहर परिसरात पावसाळी पर्यटनावर प्रशासनाकडून बंदी घातली आहे. परिणामी, यावर आधारित हजारो नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे.
पुणे शहर परिसरात विविध ठिकाणी निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. प्रामुख्याने लोणावळा, खंडाळा, मुळशी परिसर, सिंहगड परिसर, भोर-वेल्हे तालुका अशा अनेक ठिकाणांचा यामध्ये समावेश होतो. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी स्थानिक नागरिकांकडून विविध सुविधा उभारल्या आहेत. अलीकडील काळात पर्यटन हा तेथील नागरिकांसाठी जोडधंदा बनला आहे.
अगदी चिंच, कैरी, बोरे यासारखा रानमेवा, विविध खाद्यपदार्थांची विक्री करणे, मोठे-मोठे लक्झरी हॉटेल उभारून पर्यटकांना राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे, कृषी पर्यटन अशा अनेक प्रकारच्या व्यवसायामध्ये स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग आहे. या सर्वांना पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने स्थानिकांसाठी हा रोजगाराचा एक महत्त्वपूर्ण स्रोत बनला आहे.
मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पावसाळी पर्यटनावर बंदी घातली आहे. त्याचा फटका साहजिक या व्यावसायिकांना बसणार आहे. विशेषत: खाद्यपदार्थ विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यावर सर्वाधिक परिणाम होणार आहे. हजारो नागरिक या आर्थिक फटक्याचे बळी ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
साहसी पर्यटनावरही परिणाम
पावसाळ्यात शहराच्या आसपासच्या निसर्गरम्य भागात ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसिंग यासारख्या साहसी गोष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. विशेषत: तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असते. या साहस पर्यटनाचे आयोजन करणाऱ्या संस्थांची संख्याही अलीकडील काळात वाढली आहे. मात्र, यंदा या साहस पर्यटनावरही करोनाचा प्रभाव होणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन निगडित रोजगारावर नक्कीच परिणाम होणार आहे. एक तर आधीच पर्यटनावर बंदी आहे, बंदी उठवली तरी नेहमीच्या तुलनेत पर्यटनावर किती नागरिक खर्च करतील, याबाबत साशंकता आहे. हॉटेल व्यवसायाला तर अधिक फटका बसणार आहे. विशेषत: या कालावधीत होणाऱ्या ग्रुप बुकिंगवर सर्वाधिक परिणाम होणार आहे.
– सौरभ टाकळकर, कमलिनी कुटीर