पावसाने एका झटक्‍यात सगळ्यांना ‘माणूस’ बनवलं…

– शंकर दुपारगुडे

सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, कोपरगावसह देशातल्या विविध भागांत अतिवृष्टी झाल्याने पुराने थैमान घातले. पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी माणसे एकमेकांना हात देत होती. कोणाचा जीव वाचला, तर कोणाचा मदतीअभावी जीव बुडाला. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. खाण्या-पिण्यावाचून पूरग्रस्तांचे हाल होत आहेत. कोण मदतीचा हात देईल का, याकडे नागरिक डोळे लावून बसले होते. जो हात मिळेल, तो धरून पुरातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत होते. तिथे कुठलाही भेदभाव नाही. जात-धर्म नाही, स्त्री-पुरुषसुद्धा नाही. कोणीतरी येऊन आपला जीव वाचवावा, ही केविलवाणी आशा होती. अनेकांनी देवांची याचना केली. कोणता देव मदतीला धावून आला नाही, पण देवरूपाने माणूसच धावून गेला. माणसात देव आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

जाती भेदाच्या भिंती या पावसाने पाडल्या. आता कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, कोणी मराठी नाही, कोणी भैय्या नाही, धनगर नाही, ब्राह्मण नाही कोणी शूद्र ही नाही. गरीब आणि श्रीमंतीची दरी पाण्याने संपवली. जीवघेण्या पाण्यामधून वाचवणारा तो माणूस देवासमान आहे, किंबहुना देवच समजले. पुरामध्ये वाचलेल्या एका महिलेने तर आपला जीव वाचवणाऱ्या लष्कराच्या जवानांचे पाय धरून दर्शन घेतले. त्यांच्या रूपाने आपल्याला देव भेटला म्हणूनच आपला जीव वाचला. ही सद्‌भावना त्या माऊलीने अबोलपणाने व्यक्‍त केली.

जाती-धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या मंडळीसाठी ही चपराक आहे. पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्यांना मदत करण्यासाठी धर्म उपदेश करणारे धावून गेले नाहीत. विविध राजकीय पक्षांची रंगीबेरंगी झेंडे घेऊन मिरवणारी लोक अशा संकटकाळी नसतात. धर्माच्या नावाचा बाजार करुन माणसा-माणसात भेद निर्माण करणारे अशा संकटसमयी का शांत राहतात. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला जातीच्या साखळीत अडकवत भेदभाव पसरवणाऱ्यांनी जरा विचार करावा. मानवतेच्या एकसंघतेला निसर्गानेच एकरूप ठेवण्याचे काम केले. निसर्गाच संकट आलं, तर ठराविक एका धर्मावरती अन्याय करीत नाही. कोणत्याही झेंड्याचा रंग बघून निसर्ग कोपत नाही. संकटात सापडलेले सर्व जाती-धर्मातील, राजकीय पक्षातील माणसांचा समावेश असतो. इथे भेदाभेद नाही. संकटात सापडलेल्यांना मदत करणारे माणसेही कधी भेदाभेद करीत नाहीत. मग इतरवेळी आनंदाच्या क्षणात माणूस भेदभावाने का वागतो, हा खरा प्रश्‍न पुढे येतो.

सत्तेच्या सारीपाटात कोणी कितीही काही सांगितले, तरी आपल्या या भारत देशात माणूसकी धर्म आजही टिकून आहे. याचे ज्वलंत उदाहरण सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांवरून दिसून येते. राजकीय लोक स्वतःचा फोटो लावून मदत करीत आहेत, पण सर्वसामान्य माणूस कुठेही गाजावाजा न करता मदत करतात. भाव दोघांचा एकच आहे.
उद्या पूर कमी होईल, ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीटनेटकं होईल. कोणी मदत जास्त करेल कोणी कमी करेल, परंतू माणुसकीच्या भावनेतून केलेली मदत माणूस धर्म टिकवण्यासाठी आहे. फक्त एक करा या पावसाने दिलेला “माणुसकीचा ओलावा’ असाच जपून ठेवावा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)