पुणे – शहर परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पडलेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. सायंकाळच्या सुमारास निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि पावसाचा आनंद नागरिकांनी घेतला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थिती यांच्या प्रभावामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली.
मात्र, आता कर्नाटक किनारपट्टी ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. मात्र, अजूनही वातावरणावरील प्रभाव कायम असून, आगामी चोवीस तासांत पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यभरातही तापमानात किंचित घट नोंदवली गेली.