पुणे : मुंबई आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोर धरलेला पाऊस पुण्यावर अजूनही रुसलेला असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागांत काही वेळ हलका पाऊस झाला, तर खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात अजूनही अपेक्षित जोरदार पाऊस झालेला नाही.
हवामान विभागाने पुणे शहर आणि परिसराचा दि. 6 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज दिला आहे. त्यानुसार या आठवड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. दैनंदिन तापमानदेखील 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. धरणसाखळी परिसरात पुरेसा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. कारण, गुरुवारच्या आकडेवारीनुसार खडकवासला प्रकल्पात जेमतेम अडीच टीएमसी साठा राहिला आहे. राज्यात कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भात येत्या काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
पाऊस का पडत नाही?
हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेले कमी दाबाचे क्षेत्र पाहिजे त्या प्रमाणात निर्माण होत नाही. त्याला प्रामुख्याने भौगोलिक परिस्थिती जबाबदार आहे. प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातील “आयओडी’ अर्थात इंडियन ओशियन डायपोल म्हणजेच समुद्राच्या दोन टोकांच्या पृष्ठभागावरील तापमान अनुकूल नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. जुलैच्या मध्यापासून यात सुधारणा होण्याचा अंदाज आहे.