पिंपरी-चिंचवड शहरात पावसाच्या हलक्‍या सरी

पिंपरी – मॉन्सूनपूर्व पावसाने शहरात दिवसभरात ठिकठिकाणी हजेरी लावली. शहराच्या विविध भागात तुरळक सरींसह पावसाची हजेरी सुखावणारी ठरली. त्यामुळे सकाळपासून जाणवणाऱ्या कमालीच्या उकाड्यापासून शहरवासियांची सुटका झाली.

शहरवासियांनी सायंकाळी काहीसे आल्हाददायक वातावरण अनुभवले. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. काही वेळाने दुपारी साडे तीनच्या सुमारास पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली. त्यानंतर दुपारी शहराच्या विविध भागात पावसाचा हलकासा शिडकावा झाला.

येत्या बुधवारपर्यंत (दि.26) मॉन्सून सर्व राज्य व्यापणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या मॉन्सूनकडे लागल्या आहेत. मात्र, सात जून व त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला होता. मात्र, त्यानंतर वायू या चक्री वादळामुळे मॉन्सुनचा वेग मंदावला. परिणामी वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला. त्यामुळे शहरवासिय हैराण झाले होते. त्यातच रविवारी दुपारी या उकाड्यात आणखी वाढ झाली.ढगाळ वातावरणात पावसाचा शिडकावा झाल्याने, वातावरणातील उकाडा काही प्रमाणात कमी झाला.

दिवसभर उडाका आणि पहाटे काहीसे आल्हाददायक वातावरणाचा अनुभव पिंपरी-चिंचवडकर घेत आहेत. येत्या बुधवारपर्यंत मॉन्सून सर्व राज्यात सक्रीय होणार असल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.