गोंदिया – गोदिंया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्या दिवशी कायम असून जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया येथे पावसामुळे घर कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एक पेट्रोल टँकर वाघ नदीत वाहून गेलेला आहे.
दरम्यान मुसळधार पावसाने नागरिकांची रात्रीपासूनच तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात सुद्धा पाणी आल्याने यांच्या मूर्तीच्या समोर पाणी साचलेले आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह आसपासच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे.
अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी
नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांचा उपसा न केल्याने सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांची तारांबळ उडाली होती. तर अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र होते.
धरणांचे २४ दार उघडले
सिरपूर धरणाचे ०७ दरवाजे, पुजारीटोला धरणाचे १३ दरवाजे तर कालीसरार धरणाचे ४ दरवाजे उघडले आहे. सिरपूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरण नियंत्रणाकरीता ७ वक्रद्वारातून (गेट) १.८० मी.ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामधून १०१२.७३ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाचे १३ दरवाजे १.२० मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून ११३७ क्युमेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कालीसरार धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ४ वक्रद्वार (गेट) ०.९० मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून ३३४.०९४ क्युमेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.