चिंचवडमध्ये समाधानकारक तर थेरगावमध्ये अत्यल्प पावसाची नोंद
पिंपरी – यंदा समाधानकारक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज पावसाने मोडीत काढला आहे. पावसाळ्याचे पहिले दोन महिने उलटून गेले आहेत. याचाच अर्थ की निम्मा पावसाळा संपला आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडला आहे.
शहरातील भोसरी, चिंचवड आणि थेरगाव या भागांमध्ये घेतलेल्या पावसाच्या नोंदीनुसार चिंचवडमध्ये सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे, तर मुळशी तालुक्यातील थेरगावमध्ये अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. जवळपास निम्मा पावसाळा संपला आहे. जुन-जुलै महिन्यात खूपच कमी पाऊस झाला.
तर ऑगस्टमधील संततधारेने पावसाचा टक्का काहीसा वाढविला आहे. शहरातील भोसरी, चिंचवडमध्ये जून आणि जुलैमध्ये सरासरी 371.1 मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र भोसरीत अवघा 257.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही टक्केवारी सरासरीच्या 69.2 एवढी आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे ही टक्केवारी काहीसी वाढून ही ही टक्केवारी 74.01 पर्यंत पोहचली आहे.
चिंचवडमध्ये जून-जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत 312.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही टक्केवारी 84.2 एवढी आहे. तर ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत चिंचवडमध्ये 103.2 मिमी पाऊस पडला आहे. ही टक्केवारी 96.6 एवढी आहे. चिंचवडमध्ये सरासरी पाऊस झाला नसला, तरीदेखील समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. मुळशी तालुक्यातील थेरगावमध्ये जून-जुलै मध्ये 924.1 मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना, अवघा 244.2 मिमी म्हणजे 26.04 टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील दहा दिवसांत ही टक्केवारी 36.06 पर्यंत पोहोचली.
कमी पाऊस चिंतेचे कारण
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असल्याने धरण पन्नास टक्क्याहून अधिक भरले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता काहीसी कमी झाली आहे. परंतु शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने सरासरी इतका पाऊस होणे अपेक्षित आहे. शहरातील वृक्ष, भूगर्भ जलस्तर व हवामानाच्या दृष्टीने पुढील दोन महिन्यांमध्ये चांगला पाऊस होणे गरजेचे आहे.
पुढील पंधरा दिवस पावसाचा मुक्काम
नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा पश्चिम किनारी भागात सक्रिय होणार असून त्याचा जोर पुढचे सात ते आठ दिवस राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील पंधरा दिवस शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेट वेदरने वर्तविला आहे. हवामान कात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, हा पाउस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. पावसाचा अंदाज वर्तविलेल्या कालावधीत शहरातील तापमान 20 ते 20 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.