पावसामुळे नेत्यांचे पितळ पडले उघडे

खेड तालुक्‍यात मागील दहावर्षांतील सर्वाधिक यावर्षी पाऊस झाला आहे. तालुक्‍यात सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्‍न रस्त्यांचा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील निकृष्ट कामे केलेले रस्ते नादुरुस्त झाले आहेत. नव्याने कामे झालेले रस्ते उखडल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला आहे. रस्त्यांची चाळण झाली आहे. एरवी आम्ही रस्ते केले अशी फुशारकी गाजवणारे आणि ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधी तोंडघशी पडले आहेत.

तालुक्‍यात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले खरे मात्र, ही कामे किती निकृष्ट करण्यात आली याचे आत्मपरीक्षण तालुक्‍यातील नेत्यांनी करण्याची गरज आहे. निवडणुका आल्या की, केवळ रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा निधी टाकायचा नवीनरस्ते करायचे, जुने रस्ते दुरुस्त करायचे मात्र, पावसाळ्यात याच रस्त्यांची चाळण झालेली बघायची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. एरवी याबाबत तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांवर दबाव टाकणाऱ्या या नेत्यांचे पावसामुळे पितळ उघडे पडले आहे हे मात्र खरे.

पावसाचा सर्वाधिक फटका पश्‍चिम भागाला बसला आहे. भीमाशंकर परिसरात मागील दहा वर्षांचे पावसाने रेकॉर्ड मोडले आहे. मुसळधार पावसात भात पिकासह भातखाचरे वाहून गेली. मोठे नुकसान झाले आता कृषी महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे करताना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पुढे जाणे अपेक्षित असेत मात्र, मागील काळातील अनुभवानुसार नुकसानग्रस्त शेतकरी यादीत ज्यांचे नुकसान झाले नाही त्यांची नावे येतात, असे होवू नये यासाठी यावर्षी अधिकारी कर्मचारी वर्गाने पारदर्शक पंचनामे करून ते शासनाकडे पाठवणे गरजेचे आहे मात्र, यासाठी शासनाने अत्यंत अल्प कालावधी दिला असल्याने अधिकारी कर्मचारी घाईत पंचनामे करीत असल्याने येरे माझ्या मागल्या होण्याची शक्‍यता अधिक आहे.

एकीकडे पावसामुळे नुकसान दुसरीकडे वीज गुल, रस्त्यांची खड्डेमय अवस्था यामुळे तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाच्या समस्या वाढल्या आहेत, असे असताना स्थानिक व तालुक्‍याचे पुढारी याकडे लक्ष देत नाहीत सर्वसामान्य नागरिकांना तालुक्‍याच्या ठिकाणी तक्रार देण्याइतपत त्याची परिस्थिती नसल्याने या भागातील नागरिक अनेक संकटाचा सामना करीत आहेत. ज्यांना निवडून दिले ते याकडे लक्ष देत नसल्याने शासनाच्या अधिकारी वर्गाने तरी या भागाकडे लक्ष द्यावे व जबाबदारीने काम करून नागरिकांचे प्रश्‍न सोडवावेत अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांसह सर्वसामन्य नागरिकांची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.