Platform Ticket Rate : प्लॅटफाॅर्म तिकीटांच्या किंमतीत 5 पट वाढ; ‘या’ स्टेशनवर आता 10 रूपयांचं तिकीट 50 रूपयाला

मुंबई – राज्यात करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्थानकावर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीटांच्या किंमतीत रेल्वेकडून पाच पट वाढ केली आहे. मुंबईतील काही निवडक रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म तिकीटासाठी आता 10 रूपयांऐवजी 50 रूपये मोजावे लागणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST), दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्मच्या तिकीटांमध्ये पाच पट वाढ करण्यात आली आहे.

करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्लॅटफाॅर्म तिकीटांचे नवीन दर हे 24 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. हे नवीन दर 15 जूनपर्यंत लागू असणार आहेत. ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड येथील स्टेशनवरदेखील प्लॅटफाॅर्म तिकीट दर 50 रूपये केला आहे.

दरम्यान, देशभरातील इतरही ज्या ठिकाणी गर्दी असते अशा रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्मच्या तिकीटांमध्ये तीन पट वाढ करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रवाशांना संरक्षण देण्यासाठी आणि स्थानकांवर जास्त गर्दी रोखण्यासाठी घेतलेला हा तात्पुरता निर्णय आहे. या निर्णयानंतर आता 10 रुपये किंमतीचे प्लॅटफॉर्म तिकिट 30 रुपये झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.