तेहरान – इराणच्या पूर्व भागात एक प्रवासी रेल्वे रुळावरून घसरुन झालेल्या अपघातात किमान 21 जण ठार आणि 47 जण जखमी झाले आहेत. ओसाड, वाळवंटी प्रदेशातील तबास शहराजवळ झालेल्या या अपघातात रेल्वेचे किमान निम्मे डबे घसरले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही रेल्वे इराणच्या इस्लामिक रिपब्लिक रेल्वे या सरकारी कंपनीकडून चालवली जात होती. राजधानी तेहरानपासून 550 किलोमीटर अंतरावरील तबास शहराकडून याझद शहराकडे जात असलेल्या या रेल्वेमध्ये किमान 350 प्रवासी प्रवास करत होते. उत्खनन सुरू असलेल्या अरुंद मार्गातून ही रेल्वे जात असताना हा अपगात झाला. त्यामुळे रेल्वेचे डबे आणि प्रवासीदेकील हवेमध्ये फेकले गेले. उंच फेकल्या गेलेल्या डब्यांमधील प्रवासीही फेकले गेले असे एका प्रवाशाने सांगितले.
अपघाताचे वृत्त समजताच मदत आणि बचावासाठीची पथके आणि हेलिकॉप्टरदेखील घटनास्थळी रवाना झाले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी काही जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्खनन केलेल्या बागाला रेल्वे धडकल्यामुळे रुळावरून घसरली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी या अपगातातील मृतांप्रती दुःख व्यक्त केले असून या अपघाताच्या कारणांचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.