मुंबई – कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे रुळावर अचानक ट्रक आल्याने जोराची धडक होऊन अपघात घडला. ट्रकची मागची बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. पश्चिम रेल्वेमार्गावर कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे लाइनवर काम सुरू आहे.
यासाठी ट्रकमधून आवश्यक ती मालवाहतूक केली जाते. दुपारी साडेबाराच्या सुमारास आलेल्या रेल्वेने या ट्रकला धडक दिली. ट्रकच्या मागच्या बाजूचं नुकसान झाले. शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत जाऊन दुभाजकाच्या बॅरिकेड तोडून पुढे गेला.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे लाइनचं काम सुरू असताना रेल्वे मार्गावर ट्रक आला कसा? यामध्ये कुणाचा हलगर्जीपणा आहे का? याबाबत तपास सुरू आहे.