रविवार पेठेतील रेल्वे आरक्षण केंद्र बंद

…पण, अधिकृत फलक न लावल्याने नागरिकांची गैरसोय

पुणे – रविवार पेठेतील आरक्षण केंद्र रेल्वे प्रशासनाने बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आरक्षण केंद्र बंद झाले आहे, याची कोणतीही माहिती लावण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना “केंद्र कधी सुरू होणार’ याची वाट पाहात हेलपाटे मारावे लागत आहेत. जवळपास कोणतेही केंद्र नसल्याने थेट पुणे स्टेशन परिसरांत जावे लागत आहे, अशी तक्रार नागरिकांनी व्यक्त केली.

शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच रविवार पेठेमध्ये असणारे तिकीट आरक्षण केंद्र रेल्वे प्रशासनाने बंद केले आहे. मात्र या परिसरांतील नागरिकांना तिकीट आरक्षित करण्यासाठी पुणे स्टेशनला जावे लागते. पर्यायाने नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

रविवार पेठेतील आरक्षण केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सन 1957 साली झाले आहे. पुणे विभागातील अभियंत्यांना केलेल्या इमारतीच्या ऑडिटमध्ये इमारत असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. यानुसार कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मध्यवस्तीतील नागरिकांसाठी रविवार पेठेतील आरक्षण केंद्र महत्त्वाचे आहे. इमारतीच्या असुरक्षिततेचे कारण सांगून हे केंद्र बंद आहे, असे समजत असले तरी तसे दिसत नाही. नागरिकांची असुविधा रेल्वेने लक्षात घेऊन हे केंद्र सुरू करण्याबाबत फेरविचार व्हावा.
– राजेंद्र माने, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.