पारनेर – तालुक्यातील रुई चोंडा येथील धबधब्यावर नगर येथील चार रेल्वे पोलीस कर्मचारी गुरुवारी (दि.24) गेले होते. त्यातील एक कर्मचाऱ्याचा पाय घसरून तो धबधब्यात पडला. त्यानंतर या कर्मचाऱ्याचा स्थानिक पथकाने शोध सुरू केला.
मात्र शोध घेण्यास अडचणी येत असल्याने पुण्यातील एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. ही टीम लवकरच येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील रुई चोंडा धबधबा येथे नगर येथील रेल्वे पोलिसातील पो. ना. यू. एल. कोंगे, पो. शि. ए. एम. मुठे, पो. शि. जे. एस. शेख, पो. शि. जी. ए. दहिफळे हे चार कर्मचारी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या परिसरामध्ये आले होते. यातील जी. एस. दहिफळे हे मोबाइलद्वारे फोटो काढत असताना डोहात पडले. त्यानंतर इतर तीन कर्मचाऱ्यांनी याची माहिती स्थानिकांना दिली. तसेच स्थानिकांच्या मदतीने त्यांच्या शोध सुरू केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार ज्योती देवरे यांनी देखील घटनास्थळी जात शोध मोहिमेस गती दिली. तसेच नगर येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे व अग्निशमन अधिकारी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रशासनाने अथक प्रयत्न केले. मात्र दहिफळे यांचा शोध लागला नाही. त्यामुळे आज पुण्यावरून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. लवकरच हे पथक येथे पोहचेल, अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे पथकासह शोध घेत आहेत. रेल्वे पोलिसांचेही पथक शोध घेण्यासाठी आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र त्यास अद्याप यश आले नाही. कदाचित हा डोह खोल असल्याने एखाद्या कपारीत दहिफळे अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शोधास अडचणी येत आहेत. एनडीआरएफची टीम आल्यानंतर शोध मोहिमेला गती मिळेल.