रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

सीबीआयची कारवाई कागदपत्रे परत देण्यासाठी स्वीकारले तीन हजार 

सातारा – रेल रोको आंदोलन केल्यानंतर अटक केलेल्या संशयितांची कागदपत्रे परत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एम. आय. बागवान याला सीबीआयच्या पुणे येथील अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री रंगेहात पकडले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बागवान याच्या कोल्हापुरातील घरावरही छापा टाकला.

याबाबत माहिती अशी, रेल्वे पोलीस दलातील उपनिरीक्षक एम. आय. बागवान हा गेल्या दोन वर्षांपासून क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशन येथील कार्यालयात कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी एका संघटनेने रेल रोको आंदोलन केले होते. त्यावेळी बागवान याने आंदोलकांना अटक केली होती. त्याने संशयितांकडून पॅनकार्डसह अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. संशयितांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने बागवान याला कागदपत्रे परत करण्याची विनंती केली. मात्र, बागवानने त्या बदल्यात संबंधितांकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर संबंधिताने पुणे येथे सीबीआयच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवली.

सीबीआयच्या पथकाने बुधवारी सायंकाळी पाच वाजता क्षेत्र माहुली येथे रेल्वे स्टेशनवरील कार्यालयात सापळा रचून बागवानला तीन हजारांची लाच घेताना पकडले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला शासकीय वसाहतीमधील घरात नेले. त्या घराची झाडाझडती घेण्यात आली. बागवान हा मुळचा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. त्याच्या कोल्हापुरातील घराचीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. मात्र, तेथे काहीही आक्षेपार्ह सापडले नसल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)