कराड-मसूर हा रस्ता कायम वर्दळीचा असून या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित असून रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी.
कोपर्डे हवेली – कराड-मसूर रस्त्यावर रेल्वे गेट क्र. 96 वर गेटमनने एका दुचाकीधारकाला गेटमध्ये अडकवल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी, कराड-मसूर रस्त्यावर रेल्वे गेट क्र. 96 असून दि. 31 रोजी या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू होती. दरम्यान दुपारी बाराच्या सुमारास वाहतूक सुरू असताना गेटमन दगडू झोरे याने गेट बंद करण्यास सुरुवात केली.
यावेळी एक दुचाकी रेल्वे गेटमध्ये आल्यानंतर कर्मचाऱ्याने गेट बंद केले. त्यामुळे तो दुचाकीधारक गेटमध्ये अडकून पडला. यावेळेत रेल्वे आल्याने बघणाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. घटनास्थळावर जमलेल्या गर्दीने त्या मुजोर रेल्वे कर्मचाऱ्यांला चांगलीच शिव्यांची लाखोली वाहिली. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा मुजोर कर्मचाऱ्यावर वरिष्ठांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
गेट क्र. 96 वर अशा प्रकारच्या घटना वेळोवेळी घडत असतात. या घटनांना पायबंद घालण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल होणे आवश्यक आहे.
राजू थोरात, ग्रामस्थ.