पुणे – नागरिकांनी समाज माध्यमांवर स्थानकांवरील गर्दीचे जुने, बनावट व्हिडिओ शेअर करू नयेत, असे आवाहन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी केले आहे. त्यांनी शुक्रवारी व्हर्च्युअली माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर होत आहेत. याशिवाय, अनेक ठिकाणी याबाबतचा खोटा उल्लेख करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे म्हणाले.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. यामध्ये केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत चढण्याची मुभा आहे. प्रवाशांनी बोर्डिंग आणि प्रवासादरम्यान करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे, असेदेखील मित्तल यांनी नमूद केले.