बोरघाटामध्ये रेल्वे प्रशासनाकडून “स्टील’चा बोगदा
पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कमी
– कल्याणी फडके
पुणे – घाट परिसरात कोसळणारी दरड आणि त्यामुळे ठप्प होणारी रेल्वे वाहतूक हे नवीन समीकरण नाही. मात्र, या समीकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने आता पोलादी कवचाचा पर्याय स्वीकारला आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात घाटातून होणारा रेल्वे प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
घाट परिसरात दरवर्षी पावसामुळे अधिक फटका बसतो. अधिक पावसाने भराव वाहून जाणे, दरड कोसळणे, दगड आणि रेल्वे मार्गिकेवर येणे आदी घटना वारंवार घडतात. त्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊन अनेकदा गाड्या रद्द कराव्या लागतात.
मंकी हिल ते नागनाथ परिसरातील बोरघाटामध्ये दरडी कोसळण्याचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मागील वर्षी बोरघाटामध्ये भराव वाहून गेला होता. प्रामुख्याने याचा फटका पुणे-मुंबई मार्गाच्या इंटरसिटी गाड्यांना बसला होता. पावसाळ्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून त्या परिसरामध्ये लोखंडी गर्डर बसवून, सिमेंटचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. याच कामाच्या पुढच्या टप्प्यात आता बोरघाटामध्ये रेल्वे प्रशासनाकडून “स्टील’चा बोगदा तयार करण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून दरडप्रवण क्षेत्रात 2 ठिकाणी या प्रकारचे बोगदे उभारण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, मध्य रेल्वेतर्गत असणाऱ्या घाट परिसरामध्ये दरडीची पाहणी करून, त्या हटवण्यात येत आहे. या परिसरातील बोगद्यांच्या परीक्षणाचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बोगद्यामुळे काय होणार?
दरड कोसळण्याचे संभाव्य धोके ओळखून हे बोगदे तयार करण्यात येत आहेत. या बोगद्यांमुळे कोसळणारे दगड, झाड थेट रेल्वे मार्गिकेवर न पडता दरीमध्ये पडणार आहे. यामुळे रेल्वेवर दरड पडून होणारे अपघात, मार्गिकेवर अडथळे निर्माण झाल्याने विस्कळीत होणारे वेळापत्रक आदी घटनांना आळा बसणार आहे.
दरडी हटवण्यासाठी “हिल गॅंग’ सक्रीय
रेल्वे मार्गाशेजारील डोंगरावरून दरड कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करण्यात येत आहे. घाटातील दरडी पाडण्यासाठी प्रशिक्षित “हिल गॅंग’ काम करते. दोरीच्या सहाय्याने पोकळ, ठिसूळ झालेले दगड ही गॅंग खाली पाडतात.