दलालांकडून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

देशातील 141 शहरांमध्ये कारवाई; दलालांना अटक
“आरपीएफ’कडून “ऑपरेशन थंडर’अंतर्गत 276 ठिकाणी छापे

पुणे – रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाकडून “ऑपरेशन थंडर’ राबविण्यात आले. यामध्ये देशातील 141 शहरांमध्ये “आरपीएफ’च्या 276 ठिकाणी एका दिवशी आणि एकाच वेळी छापे टाकून दलालांना अटक करण्यात आली.

उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांना नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळण्यासाठी वाट पाहावी लागत होती. मात्र, याचा फायदा घेत, दलालांनी तिकिटांचा काळाबाजार केला. यामुळे बोगस तिकिटे काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली, त्याचबरोबर प्रवाशांना तिकिटे उपलब्ध होऊ शकली नाहीत. वारंवार घडणाऱ्या या प्रकाराची दखल घेत “आरपीएफ’कडून दलालांवर धाड टाकण्यात आली.

संपूर्ण देशामध्ये दि. 13 जून रोजी कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या पुणे विभागाकडून देण्यात आली.
या कारवाईअंतर्गत 375 प्रकरणांमध्ये समावेश असणाऱ्या 387 दलालांना अटक करण्यात आली. तर 22 हजार 253 तिकिटांचे 32 लाख 99 हजार 93 रुपये जप्त करण्यात आले. त्याचबरोबर या प्रकरणांमध्ये समावेश असणाऱ्या दलालांनी यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे समोर आले आहे, असे आरपीएफच्या वतीने सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.