पुणे – रेल्वे सुरक्षा दलाच्या पुणे विभागाकडून “जागते रहो’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. यांतर्गत अनधिकृतपणे आणि बेकायदेशीर स्थानक परिसरात वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार आहे.
पुणे स्थानक परिसरात विनातिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट नसणारे, भिक्षेकरी आदी सहजतेने वावरतात. प्रवासी आणि स्थानक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा वावर धोकादायक आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरील रात्री झोपणाऱ्या आणि बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर अभियानांतर्गत वचक ठेवण्यात येणार आहे.आरपीएफकडून गस्त घालण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे.
तिकीट तपासणीस आणि वाणिज्य विभागाचे अधिकारी पथकासह कारवाई करत आहेत. यासह मुंबई कायद्यानुसार भिक्षेकऱ्यांच्या वास्तव्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. यासह पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलांवर झोपणाऱ्या नागरिकांना आरपीएफकडून मज्जाव करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवसेंदिवस स्थानक पसिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
गैरप्रकार आणि धोकादायक घटना रोखण्यासाठी क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेराच्या (सीसीटीव्ही) संख्येत वाढ करणे, अधिक मेटल डिटेक्टर बसविणे आदी पर्यायांचा समावेश असणारा “हायटेक सिक्युरिटी प्लॅन’ आरपीएफकडून तयार
केला आहे.
पुणे स्थानकावर अनधिकृतपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. स्थानक परिसरामध्ये सुरक्षित वातावरण तयार व्हावे आणि प्रवाशांनी त्यांच्या साहित्याबाबत सजग रहावे असा यामागील हेतू आहे.
– अरूण त्रिपाठी, रेल्वे सुरक्षा विभाग