रायगड/कोल्हापूर – रायगड किल्ला यात्रा ही माझ्यासाठी तीर्थयात्रा असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ते आज रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगड किल्ल्याचे कशाप्रकारे संवर्धन आणि जतन केले जात आहे, त्याचे सादरीकरण पाहिले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले व होळीच्या माळावरील शिवरायांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन केले.
किल्ले रायगडवर रामनाथ कोविंद हे “रोप वे’च्या माध्यमातून आले. किल्ले रायगडावर खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेही उपस्थित होते.
रायगड भेटीनंतर रामनाथ कोविंद म्हणाले, रायगड किल्ल्याला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या यात्रेला आपण तीर्थयात्रा मानतो. तसेच विसाव्या शतकात गांधीजींनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दुर्गराज रायगड येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली. यावेळी आयोजित प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट देऊन दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले. राष्ट्रपती कोविंद यांनी गडावर आधारित माहितीपटाचे प्रकाशनही केले.