तबलिगी जमात प्रमुखाच्या पॉश फार्महाऊसवर छापा

दिल्ली पोलिसांची उत्तरप्रदेशात कारवाई

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करणारा तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद कंधालवी याच्या उत्तरप्रदेशातील पॉश फार्महाऊसवर दिल्ली पोलिसांनी गुरूवारी छापा टाकला. त्यामुळे साद विरोधातील कारवाई तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. करोना फैलाव रोखण्यासाठी गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आदेश देशभरात जारी करण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सादने मागील महिन्यात दिल्लीत तबलिगींचा मेळावा घेतला. त्यामध्ये सामील झालेल्या अनेक तबलिगी सदस्यांना करोनाची बाधा झाली. एवढेच नव्हे तर, ते सदस्य देशाच्या विविध भागांत फैलावले.

त्यामुळे देशभरातील करोनाबाधितांची संख्या अचानकपणे वाढली. त्यातून तबलिगींचा मेळावा वादग्रस्त ठरला आणि साद दिल्ली पोलिसांच्या रडारवर आला. त्याच्याविरोधात याआधीच आदेशाच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही. तो स्वत:हून होम क्वारंटाईनमध्ये गेल्याची माहिती पुढे येत आहे. अशातच दिल्ली पोलिसांनी उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यात असणाऱ्या सादच्या फार्महाऊसवर छापा टाकला. मात्र, त्या कारवाईचा अधिक तपशील तातडीने समजू शकला नाही.

सादच्या फार्महाऊसमध्ये स्विमिंग पुलसारख्या अनेक आलिशान सोयी-सुविधा आहेत. फार्महाऊसमध्ये लक्‍झरी वाहनांच्या पार्किंगासाठी आणि नोकरांच्या राहण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली असल्याचे समजते. साद कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. उत्तरप्रदेशबरोबरच दिल्लीत त्याच्या मालमत्ता असल्याचे वृत्त याआधीच प्रसिद्ध झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.