उरुळी कांचन – उरुळी कांचन, शिंदवणे व टिळेकरवाडी येथील अवैध हातभट्टींवर उरुळी कांचन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता. 30) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छापे टाकले आहे. या कारवाई पोलिसांनी 4 हजार 500 लिटर कच्चे रसायन व दारू असा 3 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शायना क्रिश राठोड (वय-19, रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली), राजेश लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) व परलोक रजपूत (रा. गोळीबार मैदान उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अश्वजित विनोद मोहोड, अमोल संजय खांडेकर व पोलीस हवालदार योगेश चंद्रकांत नागरगोजे यांनी सरकारच्या वतीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पहिल्या घटनेत शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळेशिवार परिसरात कॅनॉलचे कडेला पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा आरोपी महिला शायना राठोड या त्या ठिकाणी गावठी हातभट्टी गाळण्याची साधने जवळ बाळगुन गावठी हातभट्टी तयार करीत असताना मिळून आली. पोलिसांनी या कारवाईत 350 लिटर रसायन व 35 लिटर दारू व सरपण असा 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसर्या घटनेत, उरुळी कांचन ते डाळींब रोडवरील पांढरस्थळ परिसरात असलेल्या कॅनॉलचे उजव्या पुलाचे बाजुस आडोषाला राजेश लोंढे हा गावठी दारू बनवीत असताना आढळून आला; मात्र त्याला पोलीस आल्याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन कॅनॉलचे कडेने झाडाझुडपातून पळून गेला. पोलिसांनी या कारवाईत 1600 लिटर कच्चे रसायन, 385 लिटर गावठी हातभट्टी असा एकूण 84 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तिसर्या घटनेत, टिळेकरवाडी येथील भवरापूर व टिळेकरवाडीच्या वेशीच्या ओढ्यालगत पोलिसांनी हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य व कच्चे रसायन 2000 लिटर व 175 लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण 89 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.