नगर (प्रतिनिधी) – नगर-दौंड रस्त्यावर अरणगावजवळ एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नगर तालुका पोलिसांनी शनिवारी (दि.20) रात्री उशिरा छापा घातला. या प्रकरणी हॉटेलचा मालक, व्यवस्थापकासह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार ज्ञानेश्वर खिळे यांनी फिर्याद दिली आहे.
नगर-दौंड रस्त्यावर अरणगाव येथील हॉटेल फूडलॅंडमध्ये हुक्का पार्लर व दारू विक्री सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला. यामध्ये पोलिसांनी दोन सीलबंद सुगंधी तंबाखूजन्य पदार्थाचे बॉक्स, सहा अर्धवट वापरलेले बॉक्स, साडेतीन हजार रुपयांचे हुक्का स्पॉटचे सात संच, सात बाटल्या विदेशी मद्य, आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. या हॉटेलमध्ये हुक्क्याबरोबरच मद्यविक्री सुद्धा सुरू असल्याचे आढळून आले आहे.
आरोपींमध्ये हॉटेलचा मालक सतीश किसनराव लोटके, मॅनेजर अरुण बाबासाहेब डमडेरे, श्रेयस संजय कोठरी, अभिषेक अदाके संचेती, घनश्याम बारकू ठोकळ, किरण छगनराव निकम (रा. बुरुडगाव रोड, नगर), रमेश प्रमोद शहा (रा. कापड बाजार, नगर ), आदित्य सतीश इदानी (रा. महेश टॉकीजमागे, नगर), मोहित कृष्णकांत शहा, रोहित नितीन शहा (रा. खिस्तगल्ली, नगर), अंकित महेश लुणिया (रा. माळीवाडा, नगर), अंकित अमृतलाल कोठारी (रा. वसंत टॉकीज जवळ, माळीवाडा, नगर), गणेश संजय डहाळे (रा. तोफखाना, नगर), दीपक जितेंद्र गिडवाणी (रा. शीला विहार, पाईपलाईन रोड, नगर), यश कन्हैयालाल लुभिया (रा. मिस्किननगर, सावेडी, नगर), आदित्य गोरख घालमे (रा. गुजरगल्ली, नगर), करण विजय गुप्ता (रा. गंजबाजार, नगर), किसन चंद्रकुमार माखिजा (रा. प्रोफेसर कॉलनी, नगर) व दोन मुली, अशा 20 जणांचा यामध्ये समावेश आहे.