पुणे – खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुप्रसिध्द नंदु नाईकच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पोलीस उपायुक्त(परिमंडळ 1) प्रियंका नारनवरे यांनी आणखी एक धडक कारवाई केली आहे.
परिमंडळातील सर्व अवैध्य धंदे बंद असतानाही भावनी पेठेतील काशेवाडी येथे चमनशहा दर्ग्याशेजारी एक जुगार अड्डा सुरु होता. या जुगार अड्डयावर छापा टाकून 23 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. येथून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे दोन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा जुगार अड्डाही खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चमन शहा दर्ग्याशेजारी अन्वय युसुफ खान(56, रा.भवानी पेठ) हा बेकायदा तीन पत्ती जुगार अड्डा चालवत असल्याची खबर पोलीस उपायुक्तांना मिळाली होती. त्यानूसार एक पथक तयार करुन शनिवारी रात्री तेथे छापा टाकण्यात आला. यावेळी तेथे जुगार घेताना व खेळताना 23 व्यक्ती आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी हवालदार दत्तात्रय मच्छिंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे. मध्यंतरी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतच नंदु नाईकच्या जुगार अड्डयावर कारवाई करुन 35 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. ही कारवाई नारनवरे यांनी प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली होती. तेव्हा पावणेदोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
नंदु नाईकच्या जुगार अड्ड्याला आजवर अनेकांचा वरदहस्त होता. मात्र नारनवरे यांनी धडक कारवाई केल्याने हा विषय चर्चेचा झाला होता. या कारवाईनंतर परिमंडळ एकच्या हद्दीतील सर्व अवैध्य धंदेवाल्यांनी गाशा गुंडाळला होता. मात्र अन्वय खानने त्याचा जुगार अड्डा सुरुच ठेवला होता. या कारवाईमुळे पुन्हा एकदा अवैध्य धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत.