चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रचारासोबत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. आयकर विभागाने अण्णा द्रमुकचे आमदार आर.चंद्रशेखर यांचा ड्रायव्हर अलगरासामी याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात आयकर विभागाने एक-दोन लाख रुपये नव्हे तर तब्बल एक कोटी रुपये सापडले आहेत. एवढे पैसे सापडल्यानेराजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आयटी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 500 रुपयांच्या या सर्व नोटा होत्या. आयटी अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हा छापा टाकून ही रक्कम जप्त केली आहे. माहिती मिळाल्यानंतर आयटी विभागाने आमदाराच्या घरावर छापा टाकला. रविवारी सकाळी हा छापा टाकण्यात आला. दिवसभर सर्च ऑपरेशन करण्यात आले. यापूर्वी अण्णाद्रमुकच्या नेत्याच्या कारमधून एक कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
भरारी पथकाने पेट्टावैथालाई पुलावर चेकिंग करत असताना ही कारवाई केली होती. ही कार कथितपणे मुसिरीहून पार्टीचे आमदार सेल्वराज यांची असल्याचं सांगण्यात आलं होतं. याच मतदारसंघातून अण्णाद्रमुकने सेल्वराज यांना तिकीट दिलं आहे. चेकींग करताना पैशाचे घबाड सापडल्यानंतर कारमधील लोकांना हा पैसा कुठून आला असे विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी आम्हाला माहित नसल्याचे म्हटले.
गेल्याच आठवड्यात श्रीविल्लीपुथुर विधानसभा मतदारसंघातही एका वाहनातून 3.21 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या 6 एप्रिल रोजी तामिळनाडूत 234 जागांसाठी मतदान होणार आहे. 2016मध्ये तामिळनाडूत 66,007 मतदान केंद्रे होती. आता ही संख्या 88,936 झाली आहे. येत्या 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.