भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षच्या कार्यालयांवर छापा

शिक्रापूर -श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील माजी सरपंच तथा पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल शिवले यांच्या श्री मंगलमूर्ती डेव्हलपर्सच्या पुणे शहर, चंदननगर, हडपसर, वाघोली, कोरेगाव भीमा येथील चार कार्यालयांवर रविवारी (दि. 15) एकाचवेळी प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. शिवले यांच्यावर दोन वर्षांपूर्वीही कारवाई झाली होती.

प्रफुल्ल शिवले यांनी गेली 9 वर्षांपासून श्री मंगलमूर्ती डेव्हलपर्सच्या माध्यमातून प्लॉटिंग व्यवसायात जम बसविला आहे. दोन वर्षांपूर्वी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपद घेऊन पक्षसंघटनेत सक्रिय असलेले तथा मंगलमूर्ती डेव्हलपर्सचे संचालक प्रफुल्ल शिवले यांचे कोरेगाव भीमा, हडपसर, वाघोली, चंदननगर (पुणे) आदी चार ठिकाणच्या कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याच्या 25 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी धाड टाकली. या कारवाईत शिवले यांच्या सर्व कार्यालयांची कसून तपासणी सुरू आहे. त्यांची सर्व बॅंकखात्यांचीही माहितीही संकलित केली जात आहे. दरम्यान, शिवले यांच्यावर दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2017 मध्ये कारवाई झाली होती. त्यावेळी 36 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने तब्बल चार दिवस चौकशी आणि तपास केलेला असताना रविवारी पुन्हा धडकले. पुणे-नगर रस्त्यावर चंदननगर ते वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणात डेव्हलपर्सची कार्यालये कार्यरत आहेत. ती सर्व रविवारी उघडी असतात. मात्र, रविवारच्या कारवाईने यातील बहुतांश डेव्हलपर्सने प्राप्तिकर खात्याच्या धसक्‍याने आपली कार्यालये बंद ठेवली होती.

उपलब्ध माहितीनुसार शिवले व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व संगणक, मोबाइल प्राप्तिकर विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, शिवले यांच्यावर दोनदा प्राप्तिकर खात्याची कारवाई झाल्याने त्यांच्यावर अन्याय होत, असल्याचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.