पुण्यातील ‘वेरॉन’ उद्योग समुहावर इडीकडून छापे

कॅनरा बॅंकेचे हमीपत्र देऊन बॅंक ऑफ इंडियाकडून 293 कोटींचे कर्ज

पुणे – कॅनरा बॅंकेचे हमीपत्र (लेटर ऑफ क्रेडीट) देऊन बॅंक ऑफ इंडियाकडून 293 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी सक्‍तवसुली संचनालयाने (इडी) वेरॉन ऍल्युनियम प्रा. लि. कंपनीचे कार्यालयावर गुरुवारी छापे टाकले.

वेरॉन ऍल्युमिनय प्रा. लि., वेरॉन ऍटो प्रा. लि., वॅरोन ऍटो कॉम्प या उद्योगसमुहाच्या पुणे, रत्नागिरी, सांगली येथील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून संबंधित उद्योगसमुहाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या उद्योगसमुहाचे मुख्य संचालक श्रीकांत पांडुरंग सावळेकर यांचे बॅंक ऑफ इंडिया, कर्वेरस्ता शाखेत खाते आहे. सावळेकर यांच्या कंपनीकडून कॅनरा बॅंकेच्या डेक्कन जिमखाना शाखेकडून देण्यात आलेले हमीपत्र बॅंक ऑफ इंडियात सादर करण्यात आले. त्याआधारे बॅंकेकडून 293 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. कर्ज मंजूर झाल्यानंतर सावळेकर यांनी तातडीने या रक्‍कमेचा वापर केला. काही रक्‍कम ठेवीस्वरुपात ठेवण्यात आली. तसेच, काही थकित देणी अदा करण्यात आली. बॅंक ऑफ इंडियाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली, असे “इडी’ने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या प्रकरणात कॅनरा बॅंकेतील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारींची दखल घेऊन छापे टाकण्यात आले. सावळेकर यांनी पैसे कसे वळवले, यादृष्टीने “इडी’कडून तपास करण्यात येत आहे. तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.