राहुरी शहरात ‘रास्ता रोको’

मेंढ्या चिरडणाऱ्यांवर कारवाईची आंदोलकांची मागणी

राहुरी विद्यापीठ – राहुरीतील बाजार समितीसमोर आज सकाळी 11 वाजता यशवंत सेना, मेंढपाळ आक्रोश आंदोलनच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बुधवारी (दि.22) महात्मा फुले कृषी विद्यापीनजीक मुळा कालव्याजवळ 25 मेंढ्या चिरडणाऱ्या ढंपरच्या चालक, मालकावर कारवाई व्हावी ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर व मेंढपाळ आक्रोश आंदोलनचे अध्यक्ष सखाराम सरक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा नियोजन समिती सदस्या वैशाली नान्नोर, वावरथचे माजी उपसरपंच ज्ञानेश्‍वर बाचकर, यशवंत सेना उप जिल्हा प्रमुख किरण थोरात, अहल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय खेडेकर आदींसह तालुक्‍यातील धनगर समाज बांधव, मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजय तमनर म्हणाले की, पोलीस प्रशासन, वाळूतस्कर यांच्यातील असणारे घनिष्ठ संबंध यातूनच वाळूतस्करांची मुजोरी वाढतच चाललेली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना असूनही तहसीलदार व पोलीस प्रशासन यांनी दखल घेतली नाही. परंतु “रास्ता रोको’चा इशारा देताच पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवून ढंपर चालक गणेश सूर्यभान मगर यास अटक करून ढंपर (एमएच 17 बीडी 0536) ताब्यात घेवून कारवाई केली. परंतु भविष्यात या घटना घडू नये, यासाठी “रास्ता रोको’ करण्यात आल्याचे तमनर म्हणाले.

पोलिसांनी कारवाई केल्याचे पत्र मोर्चेकऱ्यांना दिले. त्यानंतर मोर्चेकरी शांत झाले. यावेळी मदत म्हणून घोंगडी फिरवून मोर्चेकऱ्यांमधून सुमारे 25 हजार रूपये रक्‍कम जमा केली. ही रक्‍कम अपघातग्रस्त मेंढपाळ बांधवास देण्यात आली. या मोर्चाला सामोरे गेलेले राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी अपघातग्रस्त मेंढपाळास शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)