वायनाडमध्ये भर पावसात राहुल यांचा रोड शो

मोठ्या मताधिक्‍याने विजयी केल्याबद्दल मतदारांचे मानले आभार

मलप्पूरम्‌- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाला विजयानंतर प्रथमच भेट दिली. भर पावसात त्यांचा रोड शो झाला. मोठ्या मताधिक्‍याने विजयी केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.
वायनाड मतदारसंघातील कलीकवूमध्ये राहुल यांचा रोड शो झाला.

त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पावसामुळे रस्ते जलमय होऊनही रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्याशिवाय, रस्त्यांलगत असणाऱ्या इमारतींच्या टेरेसवर आणि बाल्कनींमध्येही स्थानिकांनी आपल्या नव्या खासदाराला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. राहुल यांच्या आगमनामुळे आनंदाने पक्ष कार्यकर्ते काही ठिकाणी नृत्य करताना दिसले. कलीकवू परिसर नक्षलप्रभावित आहे. त्यामुळे राहुल यांच्या रोड शोनिमित्त मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रोड शोवेळी राहुल यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण केले. मी वायनाडच्या जनतेसाठी लढेन. मी आता केरळचा खासदार बनलो आहे. त्यामुळे वायनाडबरोबरच संपूर्ण केरळमधील जनतेशी निगडीत मुद्दे संसदेत आणि संसदेबाहेरही मांडेन. मी कॉंग्रेसचा घटक असलो तरी राजकारणापलिकडे जाऊन जनतेतील सर्व घटकांसाठी कार्य करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. मतदारांचे आभार मानण्यासाठी राहुल वायनाडचा तीनदिवसीय दौरा करणार आहेत.

यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशातील अमेठीबरोबरच वायनाडमधूनही लोकसभा निवडणूक लढवली. कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठीत यावेळी राहुल यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, वायनाडमधून ते तब्बल 4 लाख 31 हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. केरळमधील ते मताधिक्‍य विक्रमी ठरले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.