नवी दिल्ली – दुखापतीनंतर परदेशात शस्त्रक्रिया केल्यावर सध्या वॉकर घेऊन तसेच स्टीक घेऊन चालत असलेल्या लोकेश राहुलने महत्वपूर्ण विधान केले आहे. आपण लवकरात लवकर तंदुरुस्त होणार असून मायदेशात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन करु शकतो, असा विश्वासही राहुलने व्यक्त केला आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत असताना राहुलला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळे त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्यानंतर काही दिवसांनी त्याला रुग्णलयातून घरी सोडण्यात आले आहे.
आता त्याने लंडनमध्येच चालण्याचा तसेच अन्य काही व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे. तज्ज्ञांनी परवानगी दिल्यावरच तो मायदेशी परतणार आहे. विश्वकरंडक खेळण्यास उत्सूक असून त्यापूर्वीच पूर्ण तंदुरुस्त होण्यावर आपला भर असल्याचे सांगितले आहे. इतकी मोठी स्पर्धा भारतात होत असून मला ही संधी गमवायची नाही, असे राहुल म्हणाला.