बॉलीवूड आणि क्रिकेटविश्व यांचे संबंध हे वर्षानुवर्षापासून चालत आलेले आहेत. बॉलीवूडमधल्या अनेक नायिकांनी क्रिकेटविश्वातील आघाडीच्या खेळाडूंना भुरळ घातली आहे. यातील काही प्रकरणांचे नात्यांत रूपांतर झाले, तर काही “अर्ध्यावरती डाव मोडला…’ या श्रेणीत गेले.
सध्या अशाच एका प्रकरणाची चर्चा सुरू आहे. हे प्रकरण आहे बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटसंघातील फलंदाज के. एल. राहुल यांचे. बी-टाऊनमध्ये चाललेल्या चर्चांनुसार आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अथिया सध्या राहुलसोबत डेट करत आहेत. अलीकडेच एका बीचवर ही जोडगोळी दिसून आली.
वास्तविक, या दोघांच्या प्रकरणाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. मध्यंतरी अथियाला याबाबत विचारले असता तिने रागाने उत्तर दिले होते. ती म्हणाली होती, मला अशा लिंकअपच्या बातम्यांनी काहीही फरक पडत नाही. मी पूर्णपणाने तयार आहे.
मला तुम्ही कसलेही प्रश्न विचारलेत तरी मी उत्तर देणार नाही. पण प्रश्न विचारणं तुमचं काम आहे, असे समजून चालेन. अथिया पुढे असेही म्हणाली की, आमच्या वैयक्तिक, खासगी आयुष्यामध्ये कुणीही उठावं आणि लक्ष घालावं हे मला मान्य नाही.
अलीकडेच केएल राहुलने अथियाच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या होत्या आणि सोबत एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघेही सोबत दिसून येतात. यानंतर पुन्हा एकदा दोघांच्या लिंकअपची चर्चा सुरु झाली आहे.