दौंड: दौंड विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीमुळे भाजप उमेदवार तथा विद्यमान आमदार राहुल कुल आमदारकी राखणार का राष्ट्रवादीचे उमेदवार तथा माजी आमदार रमेश थोरात पुन्हा आमदार होणार? याविषयी सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली होती. सध्या मतमाेजणीस पूर्ण झाली असून राहुल कुल (भाजप)- ६७५ मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे रमेश थोरात याना पराभूत करत कुल यांनी आपली आमदारकी कायम राखली आहे.
दरम्यान, १९९० पासून २००९ दरम्यान झालेल्या सहा निवडणुका भाजपने लढविलेल्या आहेत, परंतू त्यांना खाते उघडता आले नसल्याने यंदा राहुल कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्यात कमळ फुलले आहे.
या निवडणुकीत मुख्य लढत आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्यामध्ये झाली. त्याशिवाय बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. मतदारसंघातील ३,०९, १६८ मतदारांपैकी २१२४१५ मतदारांनी मतदानाचा (६८.७१ %) हक्क बजावला आहे.
राहुल कुल यांचा विजय जाहीर होताच मतदान मोजणी केंद्राच्या बाहेर असणाऱ्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.