‘राहुल-विराट’ची आयसीसी क्रमवारीत झेप

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिका भारतीय संघाने २-१ ने जिंकली. के एल राहुलच्या ९१, रोहितच्या ७१ आणि विराटच्या नाबाद ७० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना एकतर्फी जिंकला. मालिकेत विराट आणि राहुलने प्रत्येकी दोन-दोन अर्धशतक लगावले आणि तीन सामन्याच्या मालिकेत १५० पेक्षा अधिक धावा काढल्या, ज्याचा फायदा दोघांना आयसीसी क्रमवारीत झाला.

भारताचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलला त्याच्या ९१ धावांच्या खेळीचा लाभ क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी झाला असून त्याने ७३४ गुणांसह ६ व्या स्थानी झेप घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत राहुल आणि विराट कोहली यांनी स्थान उंचावले आहे. दोन महिन्यांनंतर कोहलीने क्रमवारीत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. कोहली ६८५ गुणासह पहिल्या १० खेळाडूंत दाखल झाला आहे. याआधी कोहली १५ व्या स्थानावर होता. रोहित शर्माची एका स्थानाची घसरण झाली असून ६८६ गुणासह नवव्या स्थानी पोहचला आहे.

क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम ८७९ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा आरोन फिंच ८१० गुणांसह दुस-या तर इंग्लंडचा डेविड मालान ७८२ गुणांसह तिस-या स्थानी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.