मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमितता घडल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केला. त्याचे जोरदार समर्थन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राहुल यांनी भाजपच्या बहुमताचा बुरखा फाडला, असे त्यांनी म्हटले.
राहुल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी अवघ्या ५ महिन्यांत ३९ लाख नवे मतदार वाढल्याचा दावा केला. त्यावर उद्धव यांनी ठाकरेसेनेच्या एका कार्यक्रमात भाष्य केले. विधानसभा निवडणुकीतील पराभव खरा असल्याचे विरोधकांना वाटत नाही. त्याप्रमाणेच भाजपलाही स्वत:चा विजय विश्वसनीय वाटत नाही, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला.
कॉंग्रेस, ठाकरेसेनेप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीचा घटक असणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चानेही (झामुमो) राहुल यांची भूमिका उचलून धरली. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात पुन्हा-पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशावेळी विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने उत्तर द्यायला हवे, अशी अपेक्षा झामुमोने व्यक्त केली.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस, ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या आघाडीची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. तर, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने महाविजय मिळवला.