Rahul Solapurkar | मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेले सोलापूरकर यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राहुल सोलापूरकरांना महाराष्ट्राचा रोष सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. त्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेले विधान समोर आले आहे. याबद्दल आता त्यांनी व्हिडिओ शेअर करत जाहीररित्या माफी मागितली आहे. तसेच त्यांनी केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे.
नेमकं राहुल सोलापूरकर व्हिडीओमध्ये काय म्हणाले ?
सोलापूरकर म्हणाले की, “मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर. पुन्हा सर्व बांधवाशी संपर्क करतोय. 2 स्पष्टीकरण द्यायची आहेत. माझ्या पॉडकास्टमधील 2 वाक्य काढून प्रचंड गदारोळ माजला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्राहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना एक शब्द चुकीने गेला होता. मी त्याबद्दल माफी मागितली. माझा तो शब्द हा विषय नव्हता. तर मला महाराजांच्या राजनीतीविषयी बोलायचं होतं. महाराजांनी कशी सुटका करुन घेतली हे मला सांगायचं होतं. पण लाच हा शब्द मी चुकून वापरला आणि अनेकांच्या भावना दुखावल्या. ज्याबद्दल मी जाहीर माफी मागितली.”
“कोण कुठल्या घरात जन्माला आला यावर त्याची जात ठरत नाही”
पुढे ते म्हणाले, “आज पुन्हा एकदा एक विषय पुढे आला आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी विधान केलं. छत्रपती राजर्षी शाहु महाराजांची भूमिका करताना त्यात एका प्रसंगात एक विषय होता, कोण कुठल्या घरात जन्माला आला यावर त्याची जात ठरत नाही. तर तो काय करतो यावर त्याची जात ठरते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्याने ते क्षत्रिय ठरतात. या न्यायाने बाबासाहेब आंबेडकर अभ्यासाने इतके विद्वान होते की त्या अर्थाने ते ब्राम्हण ठरतात. चातुरवर्णाचं वितरण आहे. यातील 2 वाक्य काढून काही लोकांची मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
“गेली 40 वर्षे या क्षेत्रात वावरत असताना अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यानं देतोय. त्यांना नतमस्तक होऊन मी भाषण देतो. या सर्वांचा आदर्श घेऊनच पुढे जातो. तरीही हे का केलं जातंय, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. त्यांच्याविषयी काही अपमानजनक वक्तव्य माझ्याकडून होणार नाही. जर कोणाला तसं वाटत असेल तर मी आताही पुन्हा एकदा जाहीर माफी मागतोय. राहुल सोलापूरकर हा प्रामाणिक भारतीय आहे. माझ्याकडून कुठल्याही महाव्यक्तीला कलुषित करण्याचा प्रयत्न स्वप्नातही होणार नाही. मी पुन्हा माफी मागतो,” असं म्हणत सोलापूरकरांनी माफी मागितली आणि केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा:
देवासमोर दिवा लावला अन् घडली मोठी दुर्घटना; आगीत होरपळून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी