भाजप नेत्याची टिप्पणी: इटालियन संस्कृतीत त्यांची वाढ
भोपाळ – मध्यप्रदेशचे माजी मंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी शुक्रवारी कॉंग्रेस नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते भाऊ-बहीण कधीच रक्षाबंधन सण साजरा करताना दिसले नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.
निवडणुकांच्या काळात राहुल मंदिरांसमोर छायाचित्रे काढून घेतात.
मात्र, त्यांच्या हातावर त्यांची बहीण राखी बांधत असल्याचे एकही छायाचित्र कधी पाहावयास मिळाले नाही. इटालियन संस्कृतीत त्यांची वाढ झाली आहे. ते हिंदू सण साजरा करतात का ते माहीत नाही, असे सारंग येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्या वक्तव्यावरून कॉंग्रेसने सारंग आणि भाजपवर पलटवार केला. भाजप नेत्यांसाठी धर्म हा राजकारणाचा भाग आहे.
मात्र, कॉंग्रेससाठी तो श्रद्धेचा विषय आहे. भाजप नेत्यांच्या दिखाव्यावर कॉंग्रेसचा विश्वास नाही, असे प्रत्युत्तर मध्यप्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी दिले. धार्मिक श्रद्धेविषयी भाजपकडून प्रमाणपत्र घेण्याची कॉंग्रेसला गरज नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.